Soybean Farming : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील कृषी विद्यापीठांनी आपल्या शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे विविध वाण विकसित केले आहे. यामध्ये मराठवाडा कृषि विद्यापीठ देखील अग्रेसर राहिले आहे. दरम्यान याच मराठवाडा कृषी विद्यापीठातून आता राज्यातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक गोड बातमी समोर येत आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठासाठी अभिमानाची बाब ठरली असून विद्यापीठाच्या सोयाबीन संशोधन प्रकल्पाद्वारे विकसित करण्यात आलेल्या ‘एमएयुएस-७२५’ या सोयाबीन वाणास नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क नोंदणी प्राधिकरणाकडून (PPV&FRA) अधिकृत मान्यता व नोंदणी प्राप्त झाली आहे. या नोंदणीमुळे विद्यापीठास या वाणावर वनस्पती वाण हक्क प्रदान करण्यात आले असून संशोधन क्षेत्रातील हे एक महत्त्वपूर्ण यश मानले जात आहे.

हे यश माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रेरणेमुळे साध्य झाले आहे. तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या प्रभावी सहकार्यामुळे आणि शास्त्रीय मार्गदर्शनामुळे हा वाण विकसित होऊ शकला. ‘एमएयुएस-७२५’ हा वाण अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये स्थानिक तसेच राष्ट्रीय तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस ठरला आहे.

दि. २४ ते ३० डिसेंबर २०२१ दरम्यान झालेल्या ४९ व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समितीच्या बैठकीत या वाणाची उत्पादनक्षमता आणि कीड-रोग प्रतिकारक्षमता लक्षात घेऊन मराठवाडा विभागासाठी लागवडीस शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर भाकृअपचे उपमहासंचालक (पीक विज्ञान) डॉ. टी. आर. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दि. २६ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या केंद्रीय उपसमितीच्या ८९ व्या बैठकीत हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी शिफारस करण्यात आला. अखेर भारत सरकारच्या कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दि. ६ मार्च २०२३ रोजीच्या अधिसूचनेद्वारे ‘एमएयुएस-७२५’ हा वाण महाराष्ट्रासाठी अधिसूचित केला.

हा वाण ९० ते ९५ दिवसांत तयार होणारा लवकर येणारा असून, झाडावर शेंगांचे प्रमाण अधिक असते. सुमारे २० ते २५ टक्के शेंगांमध्ये चार दाणे आढळतात, त्यामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होते. प्रमुख कीड व रोगांना मध्यम प्रतिकारक्षमता आणि कोरडवाहू परिस्थितीत चांगले उत्पादन देण्याची क्षमता ही या वाणाची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. सरासरी २५ ते ३१.५० क्विंटल प्रति हेक्टर इतकी उत्पादकता असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास हा वाण निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.

या वाणाच्या विकासासाठी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, माजी सोयाबीन पैदासकार डॉ. एस. पी. मेहत्रे, सहाय्यक पैदासकार डॉ. व्ही. आर. घुगे यांच्यासह अनेक शास्त्रज्ञ व संशोधन कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.

वैभव थोरात ह्यांना डिजिटल पत्रकारितेचा ५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांना अहिल्यानगरमधील राजकीय, सामाजिक आणि...

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *